राईड विथ रेन या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
अमरावती सायकलिंग असोसिएशन या संघटनेने जुलै महिन्यामध्ये “राइड विथ रेन” ही स्पर्धा घेतली होती या स्पर्धेमध्ये २६२ स्पर्धकांनी भाग घेतला होता यापैकी १९२ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये किमान २० दिवस २० किलोमीटर सायकल चालवायची होती. सातत्याने एकही दिवस न चुकता 31 दिवस सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांनाबक्षिसे देण्यात आली. महिला गटामध्ये मेघा कराळे अंजली झोड व वैशाली सरागे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. तर पुरुष गटामध्ये श्री केशव निकम आबासाहेब नेमाने विजय महल्ले यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व यशस्वी रायडर बंधू-भगिनींना सुवर्ण, रजत अथवा कास्य पदक देऊन सन्मानित करण्यासाठी कार्यक्रम सिपना इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आला होता. अत्यंत देखणा व भरगच्च असा झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर कुलकर्णी होते तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नाशिक रॉयल रायडर व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठ चे संस्थापक प्रसिद्ध डॉक्टर श्री आबा पाटील उपस्थित होते. डॉक्टर आबा पाटील यांनी पंढरपूर शेगाव शिवनेरी अशा अनेक राईड करून 75 हजार किलोमीटर सायकलिंग आजपर्यंत केलेली आहे। डॉक्टर आबा पाटील यांनी आपल्या ओघवत्या व भारदस्त वाणी मध्ये आपल्या सायकल वर व बुलेट मोटरसायकलवर स्वार होउन फत्ते केलेल्या विविध मोहिमेबद्दल आपले अनुभव सर्वांसमोर कथन केले लडाख सारख्या दुर्गम भागामध्ये सायकल अथवा मोटरसायकलने फिरताना कोणत्या प्रकारे नियोजन करावे कोणती काळजी घ्यावी याबाबत त्यांनी अत्यंत उत्तम विवेचन केले सायकल रायडर करता संघटन कसे बांधावे व कमीत कमी खर्चामध्ये विविध योजना कशा आखाव्या याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सायकलिंग करणे हा कसा आनंद वृद्धींगत करणारा व्यायाम आहे याबाबत आपल्या खुमासदार शैलीमध्ये माहिती दिली। वर्षभर चालणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना त्यांनी मार्गदर्शन केले व यशस्वी रायडरचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात मंचावर पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) चे श्री सूर्यकांत जगदाळे व अमरावतीचे तहसीलदार श्री संतोष काकडे उपस्थित होते हे दोन्ही अधिकारी उत्तम सायकलिस्ट असल्याने त्यांनीही उपस्थित नागरिक व सायकलिस्ट ला मार्गदर्शन केले. महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळून घेतल्याबद्दल श्री सचिन आनंद पारेख व रितेश जैन तिताजी यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये आभार मानण्यात आले. कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचा परिचय डॉक्टर सुरीता डफळे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन सलोनी पडवळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सुनील पाठक यांनी केले.